Welcome Guest  Login
सदर माहिती वीरशैव लिंगायत धर्माबाबत प्रकाशित झालेल्या विविध पुस्तके व लेखातून घेतली गेली आहे.
सदर माहिती बाबत काही आक्षेप असल्यास / माहिती दुरुस्त करावयाची असल्यास / अधिक माहिती द्यावयाची असल्यास आमच्याशी संपर्क करा. आम्ही आपले स्वागत करतो. X

-: गौरीपूजन :-

Gauri Pujan

महिलांच्या जिव्हाळ्याचा उत्सव म्हणजे गौरीपूजन.

आपल्या संस्कृतीतील स्त्रियांची समृद्धी, शौर्याचे महत्त्व सांगणारा उत्सव आहे. भाद्रपद शुद्ध षष्ठीला ज्येष्ठा गौरीच्या तीन दिवसीय व्रताला प्रारंभ होतो.

अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठा गौरींचे आगमन होते. दुस-या दिवशी ज्येष्ठा नक्षत्रावर गौरींचे मनोभावे पूजन होते. तिस-या दिवशी भाद्रपद शुद्ध अष्टमीला मूळ नक्षत्रावर गौरींचे विसर्जन होते.

पूजा विधी
गौरींसमोर पहिल्या दिवशी दूर्वा, कापूस, आघाडा वाहतात. दुस-या दिवशी पाना-फुलांची आरास केली जाते. शेवंतीची वेणी, हार, चाफ्याचे फूल, केवड्याची पाने अर्पण केली जातात. 16 भाज्या, 16 कोशिंबिरी, 16 चटण्या, 16 पक्वान्ने तसेच फराळाचे पदार्थ यांचा नैवेद्य दाखवला जातो.

गौरीची कथा
दारिद्रय़ाने पछाडलेला असा एक मनुष्य जीव देण्यासाठी नदीवर गेला. नदीच्या प्रवाहात उडी मारणार तोच तेजस्वी चेह-याची एक स्त्री त्याच्यासमोर आली आणि तिने त्याचे मन वळविले. इतकेच नव्हे, तर ती त्याच्यासोबत त्याच्या घरी गेली. घरात अन्नधान्याची सुबत्ता होण्यासाठी नदीकाठची माती घरभर सगळीकडे विखुरण्यास तिने त्याला सांगितले. तेव्हापासून प्रत्येक पावसाळ्यात ती माती घरभर विखुरण्यास म्हणजे शेती करण्यास सुरुवात केली आणि त्याचे दारिद्रय़ नाहीसे झाले. ही अर्थात दंतकथा असली तरी काही तरी वास्तवाचा लवलेश असल्याशिवाय त्या अस्तित्वात येत नाहीत. त्यामुळे आजही स्त्रिया ‘गौरीला’ म्हणजेच या सुबत्तेला, संपन्नतेला आवाहन करतात, तर गौरीचा सण वरून एक धार्मिक विधी वाटत असला तरी तो साजरा करण्यामागे एकेकाळी स्त्रीने मानवाची उपासमारीतून मुक्तता करून कृषिक्रांती केली हे विसरून चालणार नाही. गौरीची ही कथा आजही घराघरात सांगितली जाते; मात्र यातून बोध घेतला जात नाही.